गंगापूर, (प्रतिनिधी): आरापूर येथून जवळच असलेल्या मुंबई नागपूर महामार्गावर आरापूर शिवारामध्ये डीजेच्या टेम्पोला आयशरने पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये २ जण जागीच ठार झाले असून दोन जखमी असून ही गुरुवारी पहाटे ३:३० सुमारास घडली.
याबाबत शिल्लेगाव पोलिसांनी दिलेले माहिती अशी की संभाजीनगर वरून एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी डीजेचा टेम्पो हा वैजापूर कडे जात असताना आरापूर शिवारामध्ये डीजे टेम्पो चालकाने लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला डीजे टेम्पो (एम. एच ०४ एफ. डी. ८१०४) उभा केला असता शेंद्रावरून डोंबिवलीकडे मालवाहतूक करणारा आयशर (एम.२० ई.एल १७७९) ने डीजे टेम्पोला पाठीमागून जोराचे धडक दिली.
यामध्ये डीजे हा रस्त्याच्या कडेला पलटी होऊन या अपघातामध्ये राहुल दिलीप राठोड (वय २१ वर्ष राहणार कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (वय - ३० वर्ष रा. जडगाव ता. छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे. जखमीवर उपचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय गोंडे यांनी धाव घेऊन उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली नव्हती. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे धनंजय गोंडे करत आहे.














